*जीवन त्यांना कळले हो*
*डॉ परमेश्वर पाटील,*
सहाय्यक प्राध्यापक, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी.
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीप्रमाणे , प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न गुणवैशिष्ट्यांनी युक्त असते. ती अनेक चांगले वाईट गुण घेऊन सतत वावरत असते. व्यक्ती दोषाचा व चुकीचा पुतळा असते, मात्र जी व्यक्ती आपल्यातील दोष कमी करण्याचा कायम प्रयत्न करते व इतरांकडून तसाच आग्रह धरते ती नक्कीच नावलौकिक प्राप्त करते. कारण शरीर व मनाला लागलेली कोणतीही सवय सहजासहजी कमी अथवा नाहीशी करणे हे तसे कठीण! मात्र अशक्य नसते. याच न्यायाने तिची वजाबाकी करण्याचा प्रयत्न जीवनाच्या धोपट मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी पुरेसा असतो. आणि मग खऱ्या अर्थाने जीवन प्रवास सुरू होतो.
खरं तर बऱ्याच वेळ इतरांचे उणे- दूने काढणे, दोष दाखवणे, समोरचा कसा चुकीचा आहे आणि मी कायम कसा इतरांना सावरतो, समजून घेतो, माझ्यामुळेच हे शक्य झाले, प्रत्येक घटनेत माझी भूमिका कशी महत्वाची होती हे ठासून सांगत सर्व काही मी होतो म्हणूनच!.
असे कायम मी पण गाजविण्याची व गाजावाजा करण्याचा जणू शरीर आणि मनाने ध्यासच घेतला तर आपण आपल्या जीवनाचा धोपट मार्ग सोडून लांब कुठेतरी खाईत चाललो आहोत.
असं समजण्यास जाणत्या मनुष्यास हरकत नसावी.
जगाच्या पाठीवर अनेक थोर महापुरुष होऊन गेले. ते मनुष्य धर्माच्या गुण वैशिष्ट्यांनी युक्त असेच होते. कारण आपल्या जीवनाचं झिजणं हे स्वतः साठी नसून इतरांच्या नखभर तरी कामात आलं पाहिजे तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे याची सतत जाणीव ठेवत. समाज हित व समाजकार्याचा वसा घेऊन आयुष्यभर खडतर प्रवास अंगिकारला. याउलट नाव व प्रसिद्धीची अभिलाषा न बाळगता केवळ काम हे सेवा म्हणून करत राहणे हे थोर व्यक्तींच्या जीवनाचे सार आहे. कितीही मोठे काम केले, त्यासाठी कितीही यातना भोगल्या, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही मी हे केले! माझ्यामुळे हे झाले! असा भ्र शब्द...ही न काढणारी माणसाचं खऱ्या अर्थाने जीवन जगले असं म्हणता येईल. कारण
*तुजसाठी जनन ते जनन
तुजवीण जनन ते मरण*
अशी भूमिका जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनाचा खरा आनंद उपभोगू शकत नाही.
थोर महात्मे होऊन गेले
चरित्र त्यांचे पहा जरा।
आपण त्यांच्या समान व्हावे,
हाच सापडे बोध खरा।।
आपण त्यांच्याप्रमाणे वागावे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जीवन व्यतीत करावे, असाच बोध त्यामधून होतो.
'मी' आणि 'माझे' या ऐवजी किमान ' आपण ' आणि ' आपले ' अशा शब्दप्रयोग करण्यापासून जरी सुरुवात केली तरी आपण आपल्याला चिकटवून घेतलेला अहंकार सोडून इतरांसाठी जगणं, वागणं या दिशेने मार्गक्रमण करण्यास आरंभ केला आहे असे म्हणता येईल. व आपण याच सन्मार्ग चालत राहिलो तर आपलं जगणं जगणं न राहता इतरांचं जिणं व जीवनाला अर्थ प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही.
आपल्या विशिष्ट वाढत्या वयाबरोबर विचारांची उंची गाठली , मनाच्या कक्षा रुंदावल्या तर आपलं अहंभाव बाजूला जाऊन जीवनात सत्व येईल, आपल्या कार्याचा दरवळ सुटेल जसा एखाद्या पिकलेल्या रसाळ फळाचा सुटावा ना अगदी तसा! व आपणास आपल्या जगण्याचा खरा अर्थ उमगेल
' मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणे गळले हो
जीवन त्यांना कळले हो'
याची नक्कीच सार्थता पटल्यावाचून राहणार नाही.
